पिंपरी : चिखलीतील रेनवा टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मागील तीन महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सात गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. तसेच पोलीस आयुक्तांनी मागील तीन महिन्यात सात संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील 36 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
चिखली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तपासामध्ये टोळी प्रमुख नीलेश पुखराज रेनवा (२७, रा. टॉवर लाईन, म्हेत्रे वस्ती, चिखली), रोहन कमलाकर कावळे (२९, रा. नेवाळे वस्ती, चिखली), दत्तात्रय संतोष शिंदे (२३, रा. मोरे वस्ती, चिखली), सुमित विलास क्षिरसागर (२०, रा. ताराबाई चौक, शिवकृपा कॉलनी, मोरे वस्ती, चिखली) यांच्यासह विधी संघर्षीत मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.
टोळी प्रमुख निलेश रेनवा आणि त्याचे साथीदारने संघटीत गुन्हेगारांची टोळी तयार करुन वर्चस्व दहशत प्रस्थापित करण्यासाठी एकूण सात गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले आहेत. त्यांच्या विरोधात चिखली, वाकड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, चोरी, खंडणी, तोडफोड करणे, बेकायदेशीररित्या जिवघेणी हत्यार बाळगणे अशा विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
टोळीमधील सदस्यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करण्याबाबत प्रस्ताव पोलिस आयुक्त कार्यालयाकडे सादर केला. प्रस्तावामधील कागदपत्रांची छाननी करून या गुन्ह्यामध्ये आणखी काही कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहेत.
ही कामगिरी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे, परिमंडळ तीनचे उपायुक्त शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदशनाखाली चिखलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलिस निरीक्षक अनिल देवडे, तसेच पोलिस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने केली आहे.