Pimpri Chinchwad News पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटी धारकांना भेडसावणारे प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन ‘मास्टर प्लॅन’ तयार करणार आहे. (Pimpri Chinchwad News) त्यासाठी सोसायटीधारक, बांधकाम व्यावसायिक आणि लोकप्रतिनिधी अशी संयुक्त बैठक घेवून आराखडा तयार करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहे. (Pimpri Chinchwad News)
आमदार महेश लांडगे, सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी यांची बैठक
भोसरी विधानसभा मतदार संघातील सोसायटीधारक आणि समाविष्ट गावांतील पाणी समस्यांबाबत आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी व महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची बैठक झाली. सोसायटीधारकांच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी चिखली-मोशी-चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे आणि पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार लांडगे यांनी सोसायटीधारकांच्या समस्यांबाबत लक्षवेधी सादर केली होती. सदनिका हस्तांतरण, सोसायटी हस्तांतरण आणि बांधकाम व्यावसायिकांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य सोसायटीधारकांना सहन करावा लागणारा नाहक त्रास याबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्यापार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आयुक्त शेखर सिंह यांनी पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी धोरणात्मक आराखडा तयार करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल.
त्याद्वारे सोसायटीधारक प्रतिनिधी, फेडरेशनचे प्रतिनिधी, महापालिका अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक प्रतिनिधी यांची समिती गठीत करुन प्रकल्प किंवा सोसायटी हस्तांतरण करताना घ्यावयाची काळजी आणि नियम व अटी-शर्ती तयार करण्यात येतील. ज्यामुळे भविष्यात सोसायटीधारक आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यामध्ये वादाचा प्रसंग उद्भवणार नाही.
पाणीपुरवठ्यातील ठेकेदारी बंद करा…
पाणी पुरवठ्याबाबत ठेकेदार नियुक्ती केली जाते. ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिक यांचे लागेबांधे आहेत. त्यामुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जाते. याला महापालिका अधिकारीही सामील आहेत, अशा तक्रारी येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पाणी पुरवठ्याबाबत नियोजनात होणारी ठेकेदारी बंद करावी. प्रशासकीय पातळीवर समान पाणीपुरवठा धोरण अवलंबावे. ज्यामुळे विशिष्ट भागातील नागरिकांना पाणी समस्याचा त्रास सहन करावा लागणार नाही, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत.