Pimpri-Chinchwad Accident: पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड भागातून दुचाकीस्वाराच्या विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. वाकड भागातील बीआरटी लेनमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या बाईकस्वाराचा अपघात झाला. हेल्मेट न घातल्यामुळे दुचाकीस्वाराचं डोकं थेट बीआरटी बस स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकल्याची घटना घडली.

नेमकं काय घडलं?
वाकड परिसरातल्या बीआरटी लेनमधून भरधाव वेगाने एक दुचाकीस्वार येत होता. त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यामुळे हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वाराचे डोके थेट बीआरटी बस स्टँडच्या शेजारी असलेल्या एका लोखंडी ग्रीलमध्येच अडकले.
या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, बीआरटी लेनच्या नियमांचे उल्लंघन, तसेच भरधाव वेगामध्ये बाईक चालवल्यामुळे त्याचा हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली होती.







