पुणे: गेल्या दोन वर्षांपासून पुणे पोलीस दलात वादळ निर्माण करणाऱ्या ‘शस्त्रपरवाना’ प्रकरणाचा अखेर सोक्षमोक्ष लागला आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांच्यावर झालेले गंभीर आरोप गृहविभागाने चौकशीअंती फेटाळून लावले आहेत. या निर्णयामुळे दोन्ही अधिकाऱ्यांवरील टांगती तलवार हटली असून दोघांना निर्दोष ठरवले आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्येनंतर प्रकाशझोतात आले होते. तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी आपल्या नातेवाईकांना (हगवणे बंधू) शस्त्रपरवाना मिळवून देण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाला होता. या वादात तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळात वाटप झालेल्या 433 शस्त्रपरवान्यांचीही चौकशी लावण्यात आली होती. या गदारोळामुळे अमिताभ गुप्ता व सुपेकर यांची ‘साईड पोस्टिंग’वर बदली करण्यात आली होती.
गृहविभागाने स्पष्ट केले आहे की, अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळात दिलेले सर्व 433 शस्त्रपरवाने हे ‘शस्त्र अधिनियम 1959’ आणि ‘शस्त्र नियम 2016’ मधील कायदेशीर तरतुदींचे पालन करूनच देण्यात आले आहेत. यात कोणताही बेकायदा प्रकार किंवा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत.
दुसरीकडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या चौकशीत सुपेकर यांच्याविरोधात एसीबीकडे कोणतीही ठोस तक्रार प्राप्त झाली नसल्याने हे प्रकरणही अधिकृतपणे बंद करण्यात आले आहे.







