पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कामशेत बोगद्यात आज सलग दोन अपघात घडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आणि मोठी कोंडी निर्माण झाली. सुदैवाने दोन्ही अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले असून चालक आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
पहिल्या अपघातात एसटी महामंडळाच्या दोन बस घसरून एकमेकांवर आदळल्या. या धडकेत एका बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. बसमध्ये प्रवासी असतानाही चालकांच्या प्रसंगावधानामुळे वेळीच ब्रेक लावण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आणि सर्व प्रवासी सुरक्षित बचावले.
या घटनेनंतर अवघ्या काही अंतरावर आणखी एक अपघात झाला. दोन टेम्पो घसरून एकमेकांना धडकले. हे दोन्ही अपघात पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर घडल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मावळ तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे महामार्गाचा काही भाग निसरडा झाला होता. वाहनांचा वेग, ओव्हरटेकचा प्रयत्न आणि निसरडा रस्ता यामुळे अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अपघातानंतर काही काळ वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यामुळे कामशेत बोगदा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील तपास सुरू आहे.






