पुणे: देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात तपासाला आणखी वेग आला असून या प्रकरणात आणखी एका महत्त्वाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित माहिती लीक केल्याच्या आरोपावरून मनीषा संजय हवालदार यांना CBI ने पुण्यातून ताब्यात घेतले आहे. या अटकेमुळे पेपरफुटी प्रकरणातील तपास अधिक गंभीर वळणावर पोहोचला आहे.
मनीषा हवालदार या पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेत कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित जबाबदारीमुळे त्यांना भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत प्रवेश होता. तपासात काही प्रश्न बाहेर गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात यापूर्वी अटक झालेल्या काही आरोपींसोबत संभाव्य संबंध आणि प्रश्नपत्रिका लीक नेटवर्कचा तपास CBI करत आहे. जप्त कागदपत्रे, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्याचे विश्लेषण सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
NEET UG परीक्षा पेपरफुटी प्रकरण समोर आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर CBI ने विविध राज्यांमध्ये छापेमारी करत तपासाची व्याप्ती वाढवली. या प्रकरणात महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, आतापर्यंत पुणे, लातूर, नाशिक, अहिल्यानगर, दिल्ली, जयपूर आणि इतर ठिकाणांहून एकूण 11 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. या संपूर्ण रॅकेटमागील मूळ सूत्रधार आणि आर्थिक व्यवहारांचा तपास अजूनही सुरू असून CBI पुढील चौकशी करत आहे.






