पुणे: पुण्यातील आंबेगाव परिसरात पत्नी बेपत्ता झाल्याच्या वादातून एका कॅबचालकावर बिअरच्या बाटलीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप सुरेश घोडके (वय 25, रा. धनकवडी) हे कॅब चालक आहेत. आरोपी तेजस पवार (वय 40, रा. आंबेगाव पठार) याची पत्नी संदीप यांच्या कॅबने प्रवास करत असल्याने दोघांमध्ये ओळख होती. दरम्यान, तेजस पवार यांची पत्नी काही दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत त्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

14 मे रोजी संदीप घोडके आणि तेजस पवार यांनी मिळून बेपत्ता महिलेचा विविध ठिकाणी शोध घेतला. मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर रात्री आंबेगाव येथील स्वामीनारायण मंदिरासमोरील सर्व्हिस रोडवर दोघे बसले असताना त्यांच्यात चर्चा झाली.
यावेळी आरोपीने आपल्या पत्नीबाबत संदीप घोडके यांना प्रश्न विचारला. ती तुझ्याशी संपर्कात असते, मग ती कुठे आहे, अशी विचारणा केल्याचे सांगितले जाते. त्यावर संदीप यांनी आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगितल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला.
वाद वाढल्यानंतर तेजस पवार याने बिअरची बाटली संदीप घोडके यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केल्याचा आरोप आहे. जखमींनी उपचार घेतल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक थोरात पुढील तपास करत आहेत.







