पिंपरी : पिंपळे गुरव ते दापोडीला जोडणाऱ्या पुलावरील ग्रॅव्हीटी पाईपलाईनचे पाणीपुरवठा विषयक अत्यावश्यक कामकाज करण्यासाठी येत्या ३१ जुलैल दापोडी गावाचा पाणीपुरवठा सकाळी १० ते रात्री १० पर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली आहे. याव्यतिरिक्त, दुरुस्तीच्या कामासाठी मौजे दापोडी परीसरातील सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे दापोडीमधील सर्व भागात दुस-या दिवशी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होणार असल्याचेही पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पिंपळे गुरव ते दापोडीला जोडणाऱ्या पुलावरील ग्रॅव्हीटी पाईपलाईनचे पाणीपुरवठा विषयक अत्यावश्यक कामकाज करणे गरजेचे असल्यामुळे २५ जुलै रोजी पिंपरी चिंचवड शहरामधील मौजे दापोडी गावाकरीता शटडाऊन घेण्यात आला होता. त्यानतंर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांच्या आदेशानुसार तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पुर्व सुचनेनुसार २४ व २५ जुलै रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला होता. इशारा लक्षात घेता हा शटडाऊन स्थगित करण्यात आला होता. त्यामुळे सदरचे कामकाज करण्यासाठी बुधवार ३१ जुलै रोजी दापोडी गावाचा पाणीपुरवठा सकाळी १० ते रात्री १० पर्यंत बंद राहणार आहे.
दुरुस्तीच्या कामासाठी मौजे दापोडी परीसरातील सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे दापोडी मधील सर्व भागात दुसऱ्या दिवशी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.