Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरुळी कांचन, उरुळी देवाची, आळंदी म्हातोबा, थेऊर, कदमवाकवस्ती व लोणी काळभोरसह गावात आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईदची कुर्बानी न देता दुसऱ्या दिवशी देण्यात येणार आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत उरुळी कांचन, उरुळी देवाची, आळंदी म्हातोबा, थेऊर, कदमवाकवस्ती व लोणी काळभोर गावातील मस्जीदचे ट्रस्टी, मौलाना, मुस्लिम बांधव, गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शांतता समिती सदस्य व प्रतिष्ठित नागरिक यांच्या बैठकीचे आयोजन मंगळवारी (ता. २७) करण्यात आले होते. यावेळी चव्हाण यांनी वरील माहिती दिली.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मस्जिदचे नाव व कंसात गावाचे नाव पुढीलप्रमाणे :-
१) आलमगीर मस्जिद (लोणी गाव), २) मक्का मस्जिद (लोणी स्टेशन, विश्वराज हॉस्पिटल जवळ), ३) जमते फैजाने नुरी मस्जिद / मदरसा (लोणी स्टेशन रोड, समतानगर), ४) मदिना मस्जिद/ मदरसा, घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती), ५) जामा मस्जिद (उरुळी कांचन, ग्रामपंचायत शेजारी), ६) हजरत उस्मानगनी मदरसा तबलीग (तुपेवस्ती, उरुळी कांचन),
७) आलमगीर मस्जिद, (वडकी) ८) शाही जामा मस्जिद (उरुळी देवाची), ९) मदरसा ए हजरत बिलाल जमाईतून ए मुस्लीम अलीफनगर थेऊर, १०) नुराणी मस्जिद (आळंदी म्हातोबाची), ११) रोशन मस्जिद कब्रस्तान (रेल्वेपुलाच्या जवळ उरुळी कांचन) १२) सुन्नी मस्जिद (नायगाव), १३) मोती शहावली दर्गा इदगाह (उरुळी कांचन), १४) कब्रस्तान इदगाह थेऊर – नायगाव तोड (थेऊर) या ठिकाणी असलेल्या मुस्लीम बांधवानी हा निर्णय घेतला आहे.
आगामी बकरी ईद व आषाढी एकादशी हे सण एकाच दिवशी येत असल्याने हिंदू धर्मियांनी मुस्लिम बांधवांकडे आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी करू नये अशी विनंती केली. त्यास सर्व उपस्थित मुस्लिम बांधवांनी मान्यता दिली. आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कुर्बानी देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले तसेच आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण आनंदात व शांततेत पार पाडण्याचे ठरवण्यात आले.
दरम्यान, यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक खैरनार, उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, अमित गोरे, किरण धायगुडे, सदाशिव गायकवाड, हवालदार रामदास मेमाणे आदी उपस्थित होते.
याबाबत बोलताना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण म्हणाले, “लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असणा-या मशीदीतील मौलाना, नागरिक, पदाधिकारी यांना या संदर्भात माहिती देण्यात आली होती. यापूर्वीही लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व समाज बांधवांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. जातीय सलोखा, एकोपा टिकून ठेवण्याचे काम दोन्ही समाजाच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे. आषाढी एकादशी व बकरी ईद संदर्भात दोन्ही समाजांनी एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.”