पिंपरी, (पुणे) : सोशल मिडीयावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा कॉपिटलेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्म संबंधित चित्रफितीचा वापर करुन वेगवेगळे ट्रेडिंग वापरून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यवसायिकाची तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पिंपळेसौदागर येथे घडला आहे. याप्रकरणी आप्पासाहेब भागवत भोईटे (वय ३९, रा.काटे वस्ती, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी कॉपिटलेक्स ट्रेडिंग खात्यावरील गौरव आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी भोईटे यांच्याशी गौरव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संपर्क साधला. त्यांच्या कॉपिटलेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरील ट्रेडिंग संबंधित इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची चित्रफीत पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांची दिशाभूल करुन कॉपिटलेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचे आमिष दाखविले.
फिर्यादी यांनी गुंतवणुकीची तयारी दर्शविली. त्यानुसार त्यांना वेगवेगळे ट्रेडिंग करण्यास सांगितले. फिर्यादी भोईटे यांनी वेळोवेळी १० लाख ४ हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांना कोणताही परतावा न देता फसवणूक केली. त्यांची फसवणूक झाल्याची लक्षात येताच त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल कली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.