पिंपरी चिंचवड : देशी कट्ट्यांची तस्करी करून विक्रीच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड शहर आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच ७ देशी कट्टे, १४ जिवंत काडतुसे, दोन मॅगझिन आणि एक चारचाकी वाहन असा एकूण १५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेश राज्यातून पिंपरी चिंचवड शहरात देशी कट्ट्यांची तस्करी करून विकणाऱ्या टोळीकडून पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे शाखा पोलीस पथकाने शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तसेच या टोळतील पाच अट्टल गुन्हेगारांना मालमत्ता विरोधी गुन्हे शाखा पोलिसांनी आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतून बेड्या ठोकण्यात आल्या असून प्रदीप उर्फ अक्षय बाळासाहेब ढगे, सुरज अशोक शिवले, नवल वीरसिंग झांमरे, कमलेश उर्फ डॅनी कानडे आणि पवन दत्तात्रय शेजवळ अशी बेड्या ठोकलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
नवल वीरसिंग झांमरे हा मध्य प्रदेश जिल्ह्यातील बुऱ्हानपूरचा मुळ रहिवासी असून तो तेथून देशी कट्टे, मॅगझिन आणि जिवंत काडतुसे आणून पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारांना साथीधारामार्फत विकत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे शाखा पोलिसांनी ही मोठी कामगिरी केली आहे.