पिंपरी : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून त्या-त्या भागातील पूर नियंत्रण परिस्थिती हाताळली जात आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे २८०० पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी निवारा केंद्रांमध्ये तसेच महापालिका शाळांमध्ये हलविण्यात आले आहे. याठिकाणी भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून शहरात विविध ठिकाणी बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.
‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सम्राट चौक, लालटोपी नगर, भाटनगर, पिंपरी रिव्हर रोड, रामनगर, पत्राशेड लिंकरोड, बौद्धनगर आदी ठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे ६५० नागरिकांना भाटनगर पिंपरी शाळा, आंबेडकर कॉलनी, मेवणी हॉल, निराधार हॉल पिंपरी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील चिंचवड येथील तानाजी नगर, काळेवाडी येथील पवनानगर, रावेत येथील समीर लॉन्स, शिंदे वस्ती रस्ता, जाधव घाट आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले असून सुमारे ३०० नागरिकांना काळेवाडी येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेत तसेच दत्तोबा काळे इंग्रजी मिडीयम स्कूलमध्ये स्थलांतरीत केले.
‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत लक्ष्मीनगर गल्ली क्र. ३,४,५,६, पवार वस्ती, पिंपळेगुरव, भुजबळ वस्ती, वाकड आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले असून ३१ नागरिकांना पिंपळेगुरव येथील नवीन मुला मुलींच्या शाळा नं. ५४ येथे तर १० नागरिकांना वाकड येथील आबाजी भूमकर शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.
‘ई’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत रामनगर, बोपखेल येथे २० ते २५ घरांमध्ये तीन ते चार फुट पाणी शिरले होते. याठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे १०० नागरिकांचे मनपाच्या बोपखेल येथील प्राथमिक शाळेत स्थलांतरण करण्यात आले आहे.
‘फ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत घरकुल, श्रीराम कॉलनी, तळवडे, डिफेंस कॉलनी, पाटीलनगर, चिखली आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले. या ठिकाणांहून साचलेले पाणी तसेच घरांमध्ये शिरलेले पाणी काढण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांना सूचना देऊन स्थलांतरीत करण्याची कार्यवाही सुरू आहे.
‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत संजय गांधी नगर, आंबेडकर नगर, सुभाष नगर, पवना नगर, जगताप नगर, संजय गांधी नगर या ठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे३३० नागरिकांना कमला नेहरू शाळा, पिंपरी येथे, ४५० नागरिकांना रहाटणी शाळा येथे, ४० नागरिकांना थेरगाव शाळा येथे तर ५० नागरिकांना विवेकानंद बॉक्सिंग हॉल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत हिराबाई झोपडपट्टी, कासारवाडी, भारत नगर, फुगेवाडी, दापोडी परिसर मुळानगर, मधुबन सोसायटी, जुनी सांगवी आदी ठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून १५० नागरिकांचे कासारवाडी उर्दू शाळेत, सुमारे ३०० नागरिकांचे मीनाताई ठाकरे महापालिका शाळेत, सुमारे १५० नागरिकांचे दापोडी येथील हुतात्मा भगतसिंग महापालिका शाळेत स्थलांतर तर सुमारे ३०० नागरिकांचे जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. अद्याप शहरातील विविध ठिकाणी नियंत्रण पथके तैनात असून बचावकार्य सुरू आहे.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ महापालिका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.