पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातून एक राजकीय वर्तुळातून खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या उमेदवाराला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘तु अर्ज भरला तर तुला पाहून घेईन’, अशी दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. तसेच, त्यांच्या हातातील निवडणूक संदर्भातील कागदपत्रे गॅलरीमधून खाली फेकून दिले. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवारा विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना थेरगाव येथील महापालिकेच्या ग प्रभाग कार्यालयाच्या तिसर्या मजल्यावर मंगळवारी (दि. २९) दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जावेद रशीद शेख (वय-३५, रा. आदर्श कॉलनी, वाकड) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल तानाजी कलाटे (वय-४८) यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, भाजपच्या एका स्थानिक माजी नगरसेवकाच हे षडयंत्र असून, पोलिसांनी सत्यता तपासावी, सत्ताधारी पक्षाचे सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद शेख हे वंचित बहूजन आघाडी पक्षातर्फे चिंचवड येथील विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चालले होते. त्यावेळी कलाटे यांनी शेख यांना उद्देशून तु कशाला अर्ज भरतोय, तु अर्ज भरला तर तुला पाहून घेईन, असे म्हणत शेख यांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली आहे. तसेच, त्यांच्या हातातील निवडणूक संदर्भातील कागदपत्रे गॅलरीमधून खाली फेकून दिली आहेत. पुढील तपास फौजदार बालाजी मेटे करीत आहेत.