पिंपरी-चिंचवड, ता.8: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अनेक उपाययोजना केल्यानंतरही १,३०,८०३ मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला नसल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. दरम्यान, यामुळे कराचा भरणा न केलेल्या मालमत्ता धारकांकडे ४३५ कोटी रुपये थकीत आहेत.नोटिसा बजावणे, मालमत्ता सील करणे आणि पाणीपुरवठा खंडित करणे यासारख्या गोष्टी केल्यानंतरही मालमत्ता धारकांनी थकीत कर भरला नाही. पिंपरी-चिंचवड परिसरात ६,५०,००० निवासी मालमत्ता धारक असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने नियमित व काहींचे थकीत कर वसुल करण्यासाठी नागरिकांना कारवाई केली. परंतु तरीही मालमत्ता धारकांनी कर जमा केला नाही.
नागरिकांनी थकीत व नियमित कर भरावा म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तरीदेखील १,३०,८०३ मालमत्ता मालकांनी कर भरणा केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. महानगरपालिकेने कर वसुलीसाठी १ कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले होते. दरम्यान, ३१ मार्चपर्यंत ९६६ कोटी रुपये वसूल करण्यात यश आले. गेल्या आर्थिक वर्षात १०७२ मालमत्ता कर न भरल्यामुळे सील करण्यात आल्या होत्या.दरम्यान, यंदा मालमत्ता सील केली जावू नये म्हणून ५१० मालमत्ता धारकांनी कर भरला असून ५६२ मालमत्ता धारकांचा कर थकबाकी आहे. तथापि, थकबाकी ही चिंतेची बाब आहे. येणाऱ्या वर्षात या थकबाकी मालमत्ता धारकांकडे विशेष लक्ष घेऊन कर भरून घेणार असल्याचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.