पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात एका व्यक्तीची हत्या झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. महेश चामे असे मृताचे नाव असल्याचे वृत्त समोर आली आहे. चिखलीतील कृष्णा चौकात महेश यांचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात कारणांमुळे ही हत्या झाली आहे. पोलिसांना आज सकाळी रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक तपास केला.
महेश चामे यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा होत्या. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, महेश चामे हे चिखली येथील नवचैतन्य सोसायटीत रहात होते. त्यांचे मोबाईल स्क्रीन गार्ड बसवण्याचा व्यवसाय होता. ते मूळचे लातूरचे होते. हत्येमागील हेतू उलगडण्यासाठी पोलिस या प्रकरणाच्या विविध पैलूंचा तपास करत आहेत.