Pune crime: पुणे : आमच्याबरोबर बसा, आमच्याबरोबर फिरत जा… असे सांगून देखील तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? अशी विचारणा करुन, रागाच्या भरात दोन तरुणांना बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना नुकतीच आंबेगाव खुर्द येथील जैन मंदिराजवळ १३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. यामध्ये एका तरुणाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणी दोघांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
याबाबत आर्यन रमेश लामा (वय-२३, रा. प्रथमेश रेसेडन्सी, जैन मैदिर, आंबेगाव खु.) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन गणेश दोडमणी, संकेत रेणुसे (रा. शिंदेवाडी, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्र संतोष कचरावत व जय पाटोळे यांच्यासोबत फिर्यादी आर्यन लामा हे जैन मंदिराजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आर्यनच्या परिचयाचे असलेले आरोपी गणेश व संकेत दोघे लाकडी बांबू घेऊन त्याठिकाणी आले. आरोपींनी फिर्य़ादी आर्यन याला दमात घेतले. म्हणाले की, तुम्हाला बराच वेळा आमच्याबरोबर बसत जा, फिरत जा असे सांगून देखील तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही, अशी विचारणा केली यावर, आम्हाला मारामारी व भांडण आवडत नाही. त्यामुळे तुमच्यासोबत येत नाही, असे उत्र आर्यन याने दिले. याचा राग आल्याने गणेश याने लाकडी बॅटने आर्यनला मारहाण केली. तर संकेत याने लाकडी बांबूने उजव्या खांद्यावर मारहाण केली. यामध्ये आर्यनचा हात फ्रॅक्चर झाला आहे. संतोष कचरावत याला बेदम मारहाण करुन धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.