गणेश सुळ
केडगाव : पारगाव-चौफुला या रस्त्याचे काम मागील सहा महिन्यांपूर्वी सुरू झाले आहे. या रस्त्यावरील डांबर उखडून सर्वत्र ठेवल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शाळकरी मुलांना देखील आपला जीव मुठीत ठरून प्रवास करण्याची वेळ आली आहे.
पारगाव-चौफुला या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा शासनाचा मानस आहे. गेली अनेक वर्षे हा विषय चर्चेत होता. मागील सहा महिन्यांपूर्वी या रस्त्याचे काम सुरू झाले; मात्र ते काम नक्की कसे सुरू आहे, हे सांगणे अवघड आहे. येथे शासनाने कामाचा माहितीफलक लावलेला नाही. त्यामुळे नक्की कोण हे काम करतेय याची माहिती होत नाही. कामाची सुरुवात कधी झाली आणि ते कधीपर्यंत पूर्ण करायचे आहे, रस्ता डांबरी की काँक्रीटमध्ये केला जाणार, त्याची नक्की रुंदी किती असून, तो कोणत्या बाजूला किती होणार, याची काहीही माहिती अद्यापपर्यंत कोणालाच नाही.
सध्या काम करत असलेल्या कंत्राटदाराने हा रस्ता उखडून टाकला आहे. लहान-लहान खड्ड्यांनी खाली-वर झालेला हा रस्ता अडचणीचा बनला आहे. त्यात काही छोटे पूल बनवून ते अर्धवट ठेवले आहेत. रस्त्याने जाणार्या वाहनांना आणि त्याच्या मागे-पुढे जाणार्या दुचाकीचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. बांधलेले पूल अर्धवट आहेत, तर रस्त्याच्या मध्यभागी काही ठिकाणी लोखंडी गज बाहेर आले आहेत.
पारगाव-चौफुला रस्ता ठरतोय जीवघेणा
चुकून त्यात एखादा दुचाकीस्वार पडल्यास होणार्या अपघाताला जबाबदार कोण? हा प्रश्न सर्व सामान्यातून उपस्थित होत आहे. हा रस्ता साधारण बारा किलोमीटरचा असून, त्यात जवळपास दहापेक्षा अधिक पुलांची कामे झाली आहेत. पण ती अर्धवट आहेत. परिणामी, रस्त्यापेक्षा पुलांचा मोठा धोका वाहनांना निर्माण झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत थोडाफार पाऊस झाला की, या रस्त्यावर चिखल होतो. पाऊस नसल्यास सर्वत्र धूळ पसरते. अशा खडतर रस्त्याने प्रवास करणे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे.