बापू मुळीक
सासवड(पुणे): राजुरी (ता. पुरंदर) येथील श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा आयोजित भव्य कुस्ती आखाड्यात पै. सिकंदर शेख याने पै. संजय हरियाणा याला चितपट करून श्री भैरवनाथ जोगेश्वरीचा किताब पटकावला आहे.
यावेळी 5 लाख 51 हजार रुपयांचा इनाम शेवटच्या कुस्तीला ठेवण्यात आला होता. राजुरी ग्रामदैवत श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेसाठी 400 पैलवानांनी हजेरी लावली होती. तर या ठिकाणी 175 कुस्त्या पार पडल्या. आखाड्याचे पूजन कृष्णाजी भगत माजी सरपंच (उद्योगपती )व हरिभाऊ भगत श्री भैरवनाथ उद्योग समूह यांच्या हस्ते झाले.
5 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस…
पै. सिकंदर शेख यांना माजी सरपंच कृष्णाची भगत व हरिभाऊ भगत यांच्या हस्ते 5 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यावेळी पंच म्हणून सागर चव्हाण, संभाजी चव्हाण, संजय बोरकर, वासुदेव बनकर, आप्पा भांडवलकर, महादेव भगत, दिलीप शिवरकर यांनी उत्कृष्ट पद्धतीने पंच म्हणून चांगले काम पाहिले.
राजुरी ग्रामस्थांच्या वतीने दुसऱ्या कुस्तीसाठी 2 लाखाचा इनाम होता. तिसरी कुस्ती 1 लाख 50 हजार पर्यंत ठेवली होती. चौथी 1 लाख, पाचवी 90 हजार, सहावी 80 हजार, सातवी 70 हजार, आठवी 60 हजार, नऊ व दहा 50 हजारापर्यंत कुस्त्यावर इनाम होता.
यावेळी कुस्त्यांचा आखाडा सायंकाळी चार ते रात्री साडेबारापर्यंत चालला. स्पर्धेसाठी नामांकित 400 पैलवानांनी सहभाग नोंदवला. लढती पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी तुफान गर्दी केली होती. समालोचन सागर चौधरी यांनी केले.