पुणे : मुलींच्या जन्माचे स्वागत करावे, त्यांच्या जन्मांचे प्रमाण वाढावे, स्त्रीभ्रूण हत्येला आळा बसावा,पालकांनी त्यांच्या जन्माचे स्वागत करावे यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेला पुणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातून एका वर्षभरात 9 हजार 796 अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 6 हजार 573 लेकींच्या खात्यात पाच हजार रुपयांचा मुलींच्या जन्मानंतरचा पहिला हप्ता जमा केला आहे. उर्वरीत 1676 लेकींचे अर्ज मंजूर केले असून, त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया महिला व बालकल्याण विभागामार्फत सुरू आहे.
महिला व बालकल्याण विभागाने ‘लेक लाडकी’ योजना ही मुलींच्या आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी सुरू केली आहे. मुलींचे शिक्षण पूर्ण झाल्यास त्या स्वावलंबी होतील.त्यामुळे मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे, याकडे महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या पुणे जिल्ह्यात अधिक दिसून येत आहे.
दरम्यान एका वर्षात जिल्ह्यातील सुमारे दहा हजार लेकी ‘लाडक्या’ झाल्या असून, त्यापैकी आतापर्यंत आठ हजारांहून अधिक लेकींच्या खात्यात पाच हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात यश आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे.