पुणे : शहरातील कचरा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पाला नागरिकांचा विरोध होत आहे. सूस येथील २०० टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध होत असल्याने हा प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील नांदे-चांदे गावात स्थलांतरित करण्यात येणार आहे. पुढील तीन महिन्यांत या प्रकल्पाचे स्थलांतर करण्याचे नियोजन महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे.
महापालिकेला नांदे-चांदे गावातील जागा येत्या काही दिवसांत मिळणार आहे. त्यानुसार सूस-बाणेर रस्त्यावर ओल्या कचऱ्यापासून सीएनजी तयार करणारा हा प्रकल्प महापालिकेकडून उभारण्यात आला होता. मात्र, त्याला विरोध होत होता. स्थानिक नागरिकांकडून तशा तक्रारीही महापालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. सूस रस्त्यावरील लोकवस्तीमध्ये हा प्रकल्प असल्याने तो स्थलांतरीत करावा, यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, या याचिकेवरील सुनावणीवेळी कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थलांतरित करण्याचा आदेश न्यायाधिकरणाने दिला होता. या आदेशाविरोधात महापालिकेकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. त्यावरील सुनावणी सुरू आहे. मात्र पालकमंत्री अजित पवार, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी प्रकल्प स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नांदे-चांदे या गावात कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थलांतरित करण्यात येणार आहे.
नांदे-चांदे गावात अद्यापही मोठ्या प्रमाणावर बांधकामे झालेली नाहीत. त्यामुळे महापालिकेने विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हा प्रशासनाला हा प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार ही जागा निश्चित करण्यात आली आहे. जागा ताब्यात आल्यानंतर दोन महिन्यांत स्थापत्यविषयक कामे महापालिकेकडून स्वखर्चाने केली जाणार आहेत.