पुणे : पाचशे रुपयांची नवीन नोट द्या, देवाला द्यायची आहे, असे म्हणत एका दुकानदाराचा १ लाख रुपयांचा ऐवज घेऊन जात फसवणूक केल्याचा प्रकार येरवडा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी विजयकुमार दलीचंद शिगवी (रा. सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार शिगवी यांचे सपना प्रोव्हिजन स्टोअर नावाचे दुकान आहे. शुक्रवार २९ डिसेंबर रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास एक 40 वर्षीय व्यक्ती त्यांच्या दुकानावर आला. त्याने शिगवी यांच्याकडे पाचशे रुपयाची नवीन नोट द्या, देवाला द्यायची आहे असे सांगितले.
यावेळी आरोपीने शिगवी यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढायला लावली. ती चैन पाचशे रुपयाच्या नोटेमध्ये ठेवत दुकानातील पैशांच्या ड्रॉव्हरला लावून देण्याच्या बहाण्याने सोन्याची चैन, ड्रॉव्हरमधील रोख असा १ लाखाचा ऐवज घेऊन आरोपी पसार झाला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दर्शना शेलार या करत आहेत.