पुणे : राज्य शासनाच्या आदेशानुसार नाताळ आणि नववर्षानिमित्तपुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्यातील मद्यालये (रेस्टो-बार) पहाटे पाच वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार असून वाइन, बिअर आणि देशी मद्यविक्रीची दुकाने रात्री साडेदहा ऐवजी रात्री एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी दिली.
राजपूत पुढे म्हणाले की, राज्य शासनाच्या निर्णयाची पुण्यातही अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, या काळात पुण्यात बनावट मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन होऊ नये, म्हणून विभागाची नेहमीची १४ आणि खास दहा अशी एकूण २४ पथके कार्यरत असणार आहेत. या पथकांत प्रत्येकी दोन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांवर दोन उपअधीक्षक लक्ष ठेवणार असून या दोन उपअधीक्षकांकडून अधीक्षकांना वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे.
दरम्यान, नाताळ आणि नववर्षानिमित्त २४, २५ आणि ३१ डिसेंबर रोजी मद्यालये पहाटे पाच वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्यातील मद्यालये पहाटे पाच वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. तसेच वाइन, बिअर आणि देशी मद्यविक्री दुकाने रात्री साडेदहाऐवजी रात्री एक वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.