पुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्य प्राशन केल्याचा आरोप जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी केला. यानंतर हाके यांना झालेल्या झटापट, धमकावणे तसेच अटकावप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात २० ते २५ मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लक्ष्मण सोपान हाके (वय ४२, मूळ रा. जुजापूर, सोलापूर, सध्या रा. निर्माण क्लासिक सोसायटी, कात्रज-कोंढवा रोड, पुणे) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास कात्रज- कोंढवा रस्त्यावरील एसबीआय बँकेसमोर हाके यांना काही जणांनी घेराव घातला. तसेच, त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल बोलल्याच्या रागातून तू राजेंबद्दल बोलतोस, तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांच्यापैकी काही जणांनी शिवीगाळ केली. तसेच काही जणांनी त्यांचे दोन्ही हात व मान पकडून त्यांना जाण्यापासून रोखत झटापट केली. यामुळे त्यांचा खांदा दुखावल्याचे नमूद करताना मते यांच्यासह २० ते २५ मराठा आंदोलक समर्थक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची तरतूद ठेवण्यात आली आहे.
हाके यांची मद्याची चाचणी निगेटिव्ह
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थकांनी केला होता. त्यानंतर हाके यांची वैद्यकीय चाचणी केली, मात्र यांचा मद्य पिल्याचा प्राथमिक अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे- पाटील यांच्या समर्थकांत कोंढवा परिसरात सोमवारी (दि. ३०) रात्री उशिरा बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. हाके यांनी याबाबत समाज माध्यमात चित्रफित प्रसारित केली. ‘जरांगे-पाटील यांच्या समर्थकांनी मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मी वैद्यकीय चाचणी करण्यास तयार आहे’, असे हाके माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. सोमवारी मध्यरात्री त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे त्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्यांची प्राथमिक चाचणी नकारात्मक आली आहे. तर रक्ताच्या नमुन्यांच्या चाचणीचे अहवाल अद्याप येणे बाकी आहेत.