पुणे : दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपला आहे. देशभरातच नाही तर जगभरात हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जात असतो. दिवाळी म्हटलं की गोडधोड पदार्थ, फराळाची मजा काही औरच असते. सर्वांच्या घरात या पदार्थांचा सुहास दरवळत असतो. अशावेळी परदेशात असलेल्या आपल्या भारतीय नागरिकांना फराळाची प्रामुख्याने आठवण होत असते. अशा नागरिकांना पोस्ट विभागाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली असून, जगाच्या पाठीवर पुणे शहर पोस्ट कार्यालयातून फराळ पाठवता येणार आहे.
नातेवाईकांना लाडू, चिवडा, चकल्या, करंज्या यांची चव थेट विदेशात चाखता येणार आहे. पुणे क्षेत्रातील बरेचसे उच्चशिक्षित तरुण-तरुणी जगातील विविध देशांत कार्यरत असून त्यांच्यापर्यंत दिवाळीचा फराळ कसा पाठवायचा, हा मोठा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर असतो. याचे उत्तर मात्र पुणे डाक विभागाने शोधून काढले आहे. पुणे डाक विभागाने यासाठी एक सुविधा पुणे शहरांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सहज आता विदेशातही फराळ पाठवता येणार आहे.
माफक दरात सुविधा..
काही खास पोस्ट ऑफिसेसमध्ये फराळाचे वाजवी दरात सुरक्षित पॅकेजिंग आणि विशेष बुकिंग काऊंटर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डाक विभागाच्या स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, या विविध आंतरराष्ट्रीय मेल सेवा उपलब्ध असून, या सेवांचे दर खासगी कुरिअर कंपन्यांच्या दरापेक्षा बरेच कमी आहेत. सोबतच जलद सेवा आणि डाक विभागाची विश्वसनियता ही डाक विभागाच्या सेवेची वैशिष्ट्ये आहेत.
पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध सेवा खालीलप्रमाणे..
- चिंचवड ईस्ट पोस्ट ऑफिस
- येरवडा पोस्ट ऑफिस
- पुणे हेड पोस्ट ऑफिस
- मार्केट यार्ड पोस्ट ऑफिस
- चिंचवडगाव पोस्ट ऑफिस
- आयटी पार्क हिंजवडी पोस्ट ऑफिस
- हडपसर पोस्ट ऑफिस
- एन आय बी एम पोस्ट ऑफिस
- पिंपरी पीएफ पोस्ट ऑफिस
- औंध कॅम्प पोस्ट ऑफिस
- पी सी एन टी पोस्ट ऑफिस
भारतीय डाक विभाग नेहमीच जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहिला आहे आणि असतो. डाक विभागाच्या आंतरराष्ट्रीय मेल सेवांचे दर इतर खासगी सेवांपेक्षा कमी आहेत. जगभरातील आपल्या प्रियजनांना दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी डाक विभागाच्या सेवेचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा.