लोणी काळभोर : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत (PMGKAY) गरीब नागरिकांना पुढील पाच वर्षे मोफत धान्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. या घोषणेमुळे देशातील ८० कोटींहून अधिक नागरिकांना रेशनिंगवर मोफत धान्य मिळणार आहे. याने गरीबांना फायदा होईल असे वाटत असतानाच लोणी काळभोर येथील (ता. हवेली) एका विशेष व्यक्तीच्या कुटुंबाला ऐन दिवाळीत रेशन धान्यापासून वंचित राहावे लागले. यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
बबन ज्ञानोबा वाडेकर (वय ६२, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे वंचित राहिलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाडेकर हे लोणी काळभोर येथील रहिवासी असून, ते मूकबधिर आहेत. वाडेकर यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा, सून आणि दोन नातवंडे असे सहा जणांचे कुटुंब आहे. वाडेकर यांचा मुलगा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. त्यातच रेशन धान्य दुकानातून मिळालेल्या धान्यापासून कुटुंबाला हातभार लागतो. मात्र, ऐन सणासुदीत लोणी काळभोर येथील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात धान्य आणण्यासाठी ते गेले होते. मात्र, धान्य वितरकाने कोणतीही कल्पना न देता अचानकपणे धान्य वरूनच बंद झाल्याचे सांगितले.
अन्न पुरवठा कार्यालयातून माहिती घ्या…
त्यानंतर रेशनधान्य दुकानदाराला याबाबत अधिक विचारणा केली असता, त्यांनी टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच ‘तुम्ही अन्न पुरवठा कार्यालयात जाऊन माहिती घ्या. इथे काहीही विचारू नका’, असे सांगितले. त्यामुळे आम्हाला शासनाच्या या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. आमच्या कुटुंबावर ऐन दिवाळीच्या तोंडावर उपासमारीची वेळ आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कोरोना काळात सुरु झाली योजना
कोरोना साथीनंतर केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची सुरूवात केली होती. त्या काळात हातावरचे पोट असणाऱ्यांना विशेषत: गरिबांचे उपासमारीमुळे प्रचंड हाल झाले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील 80 कोटी गरीबांच्या मदतीसाठी मोफत रेशन योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत गरीब नागरीकांना पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत दिले जाते.
योजनेपासून वंचित राहिल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ
”शासन आपल्या दारी’ या योजनेचे आम्ही लाभार्थी आहोत. मात्र, ऐन दिवाळीत शासनाकडून धान्य व दिलेले किट बंद झाल्याचे धान्य वितरकाने सांगितले. आम्ही शासनाच्या योजनेपासून वंचित राहिल्याने सध्या आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे यामागे खूप मोठा काळा बाजार असण्याची शक्यता आहे. तसेच शासनाने याबाबत चौकशी करावी”, अशी मागणी बबन वाडेकर यांचे पुत्र योगेश वाडेकर यांनी केली.