लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते सोलापूर या दरम्यान रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूकडील सर्व प्रकारची अतिक्रमणे पुढील सात दिवसांत काढून घ्या. अन्यथा अतिक्रमणधारकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी अतिक्रमणधारकांना दिला होता. मात्र, एक महिना उलटूनही रस्त्याची व अतिक्रमणधारकांची परिस्थिती ‘जैसे थे’ स्थितीत असून, संजय कदम यांचा इशारा हवेतच विरला असल्याचे म्हटले जात आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे. या महामार्गाच्या हद्दीत हडपसर ते सोलापूर या दरम्यान लगतच्या मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत आहे. तर, वारंवार वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत असून, या अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणास अडथळा होत आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे.
या महामार्गाच्या हद्दीमध्ये 8 किमी ते 252.350 किमी म्हणजे हडपसर ते सोलापूर या दरम्यान लगतच्या मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. तर वारंवार कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. तसेच या अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणास अडथळा होत आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला व्यापारी व व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत.
यामध्ये हडपसर, 15 नंबर शेवाळेवाडी, मांजरी, कवडीपाट टोल नाका, वाकवस्ती, लोणी स्टेशन चौक, लोणी कॉर्नर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनमधील एलाईट चौक, तळवडी चौक व कासुर्डी टोलनाका याठिकाणी सुमारे 70 टक्के अतिक्रमणामुळे रस्त्यातील वाहतुकीला अडसर ठरत आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला भाडेकरू, मित्रमंडळी यांना टपरी, हातगाडी लावण्यास संबंधित घरमालक व स्थानिक पुढारी व गावकारभाऱ्यांनी आपापल्या सोयीनुसार परवानगी दिली आहे. राजकारणी व संबंधित घरमालकांचे खतपाणी मिळत असल्याने बिनधास्तपणे अतिक्रमण केल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
पुणे-सोलापूर महामार्ग मोकळा नेमका कधी घेणार?
पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या सेवा रस्ताच नव्हे तर मुख्य रस्त्यावरही दुकानदारांनी अतिक्रमणे केल्याचे दिसून येत आहे. या अतिक्रमणांना स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व स्थानिक नेते यांचे पाठबळ असल्याने या ठिकाणच्या चौकांची अवस्था अतिशय गंभीर बनली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला टपरीचालक, फळेविक्रेते, हातगाडी, दुचाकी, रिक्षा यांनी अतिक्रमणे केल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्ग मोकळा नेमका कधी घेणार असा प्रश्न पडत आहे