उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकात रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूकडील १५ मीटर (सुमारे पन्नास फूट) अंतराच्या आतील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या (एनएचएआय) कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे. मंगळवारी (ता. १२) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास या कारवाईला सुरुवात झाली.
पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन परिसरातील तळवाडी चौक व जुन्या एलाइट चौकात अतिक्रमणांची संख्या मोठी आहे. मंगळवारी सकाळपासूनच कारवाई थांबवण्यासाठी कोणताही राजकीय हस्तक्षेप चालत नसल्याचा अनुभव काहींना आला. त्यामुळे परिसरात सध्या साऱ्यांनीच अतिक्रमण स्वतःहून काढण्यास सुरुवात केली. अतिक्रमणे हटविल्याने महामार्ग रुंदीकरणासही सेवा रस्ते विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हडपसर पाठोपाठ पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह पुणे-सोलापूर महामार्गावरील सर्व गावांमध्ये विविध आस्थापने, खासगी कंपन्या, सुसज्ज दवाखाने, मोठी दुकाने, शोरूम, मॉल व शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली आहेत. शहराच्या लगतचा भाग असल्याने येथील लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील पूर्व हवेलीतील लोणी स्टेशन, लोणी काळभोर, कुंजीरवाडी व उरुळी कांचन परिसरात अतिक्रमणांची संख्या मोठी आहे.
अतिक्रमण हटवण्याबाबत १५ दिवसांपूर्वीच नोटीस
महामार्गाच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूकडील १५ मीटर (पन्नास फूट) अंतराच्या आतील सर्व प्रकारची अतिक्रमणे हटविली जाणार असल्याबाबतची नोटीस १५ दिवसांपूर्वी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिली होती. यात अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे स्वतःहून न हटवल्यास अतिक्रमण कारवाईचा खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्यात येणार असल्याचे नोटीसीत नमूद केले होते. एखाद्या अतिक्रमणधारकाने खर्च देण्यास नकार दिल्यास तो खर्च संबंधितांच्या सातबारावर चढविला जाणार आहे. तर या मोहीमेला विरोध केल्यास, संबंधितावर पोलिस कारवाई केली जाणार असल्याचेही एनएचएआयने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी…
महामार्गाच्या बाजूला अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजीही घेणे आवश्यक आहे. अतिक्रमण काढण्यानंतर सेवा रस्त्यावर त्या ठिकाणी पुन्हा दुकाने थाटली जात आहे. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांचा ताफा, जेसीबसह कंत्राटदार कंपनीची वाहने आणि कर्मचारी व त्यांच्यावर प्रशासन करत असलेला खर्च व्यर्थ जाऊ नये यासाठी अतिक्रमण काढल्यानंतर त्याजागी पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
व्यावसायिकांची एकच पळापळ..!
उरुळी कांचन परिसरात अतिक्रमण मोहीम सुरू होताच काही छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या मोहिमेला व्यावसायिकांचा विरोध झाला नसला तरी टपऱ्या सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी व्यावसायिक धावपळ करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढावीत
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणची जी हद्द आहे त्याठिकाणी कोणत्याही व्यावसायिकांनी अतिक्रमण करू नये. अतिक्रमण झाल्यास वाहतूक समस्या निर्माण होते. महामार्गाच्या शेजारी अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे व कारवाई टाळावे. परिसरातील नागरिकांनी सहकार्य करावे.
– रोहन जगताप, अभियंता, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे