पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नातील मानपान केला नाही, तसेच सासरी होणार्या छळाला कंटाळून नवविवाहितेने सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हि घटना २८ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. खुशबु केशरीनंदन कर्ण (वय-३०, रा. कोहिनूर सफायर, रामनगर, ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
या प्रकरणी तिचे वडिल प्रदिप नारायणराव जमीनदार (वय-६८, रा. इंदोर) यांनी वाकड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पती केशरीनंदन तेजनारायणलाल कर्ण (वय-३३), शिला तेजनारायणलाल कर्ण आणि तेजनारायणलाल कर्ण यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशबु हिचा चार महिन्यांपूर्वी केशरीनंदन याच्यासोबत विवाह झाला होता. लग्नात वऱ्हाडी मंडळींचा मानपान केला नाही. लग्नात जास्त वस्तू आणलेल्या नाहीत, असे म्हणून तिच्यावर घरातील प्रांपचिक कारणावरुन तसेच शारिरीक आणि मानसिक छळ केला जात होता. तिला हाताने मारहाण केली जात असे, तिला कोठेही घराबाहेर जाऊ न देता तिच्यावर लक्ष्य ठेवून संशय घेतला जात होता.
दरम्यान, या मानसिक छळाला कंटाळून तिने सहाव्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीमधून उडी मारुन आत्महत्या केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.