पुणे: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा नवीन विकास आराखडा (डीपीआर) तसेच, पुणे- अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गाचाही अंतिम डीपीआर तयार झाला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारकडून अंतिम प्रस्ताव आल्यानंतर पुढील कार्यवाही वेगाने करण्यात येईल. या दोन नवीन रेल्वे मार्गामुळे प्रवाशांना जलद आणि चांगली सेवा मिळणार आहे, असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील खोडद (ता. जुन्नर) येथे जीएमआरटीचा महाकाय दुर्बिणीचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प फक्त भारतासाठीच नाही, तर २३ देशांसाठी महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाचे स्थलांतर करण्यास शास्त्रज्ञांचा विरोध होता. त्यामुळे भारतातील या शक्तीशाली केंद्राची क्षमता कमी झाली असती. त्यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जीएमआरटी प्रकल्पाला धक्का न लावता पुणे-नाशिक नवीन रेल्वेमार्गाचा नवा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हा डीपीआर तयार झाला असून, राज्य शासनाकडून डीपीआर अंतिम करून पुढील मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, पुणे अहिल्यानगर थेट रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार झाला आहे. तो मी स्वतः पाहिला आहे. हा मार्ग दुहेरी होणार असून या मार्गावर औद्योगिकरण अधिक असून, कमीत कमी जागेत मार्ग कसा होईल, यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. या मार्गाचा अंतिम डीपीआरही राज्य सरकारकडून मंजूर होऊन लवकरच केंद्राकडे सादर करण्यात येणार आहे. दौंड-मनमाड दुहेरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. आहे. तसेच पुणे- लोणावळा मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकच्या कामाला लवकरच गती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.