पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिपाई कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा ग्रेड पे लक्षात न घेता वेतन श्रेणी लागू करण्यात आली होती. त्यामुळे वेतनात तफावत निर्माण झाल्यामुळे शिपाई कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. परंतु, पुन्हा वेतन श्रेणीत सुधारणा करून ग्रेड पे लागू करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
महापालिकेत शिपाई कर्मचाऱ्यांना एकाऐकी पद असल्याने सातव्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनाच्या पद नसल्यामुळे वेतन कमी झाले होते. शिपायांना सहाव्या वेतन आयोगामध्ये ग्रेड पे १ हजार ९०० रूपये, शिपाई पदाला व नाईक पदाला २ हजार रूपये व पुढील पदासाठी २ हजार ४०० रूपये ग्रेड पे होता. सातव्या आयोगामध्ये शिपाई पदाला १ हजार ३०० ते १ हजार ७०० रूपये असल्याने शिपायांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. सातव्या वेतन आयोगामध्ये सहाव्या वेतन आयोगाचा ग्रेड पे गृहीत धरून वेतन निश्चिती करण्यात आली नव्हती. सातव्या वेतन आयोगामध्ये कमी ग्रेड पे केल्यामुळे वेतनामध्ये तफावत निर्माण झाली होती.
या संदर्भात महापालिकेचे कर्मचारी नागेशराव जाधव, भिमा निकाळजे, अविनाश वाघेरे, रवी वाघेरे, संजय मेढेकर, मोहन, फुगे, दिनगर खर्चे, सखाराम घुले, प्रशांत पाडाळे, अजय भोसले, नरेश शेडगे यांनी राज्य शासन व महापालिकास्तरावर पाठपुरावा केला. अखेर महाराष्ट्र शासनाच्या निमावलीमध्ये १२ मार्च २०२४ ला शिपाई, नाईक, हवालदार व जमादार यांची वेतन निश्चिती करून शासनामार्फत आदेश काढण्यात आला आहे. महापालिकेच्या लेखा विभागाकडून त्याबाबत ११ डिसेंबर २०२४ ला आदेश लागू करण्यात आला आहे. ही सुधारणा लागू झाल्यामुळे शिपायांना पदोन्नती मिळणार असून वेतनात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे पालिकेतील सर्वच शिपाई कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.