-बापू मुळीक
पुणे प्राईम न्यूज : प्रत्येक महिला ही देवीचेच रुप असते. हीच महिला नानाविध रुपांनी समाजात वावरत असते. संघर्ष व कष्टमय जीवन प्रवासातून समाजात आदर्श निर्माण करत असते. यापैकीच एक नवदुर्गा यशस्वीनी कदम आहेत.
दोन अपत्ये पतीची पोलिस खात्यातील नोकरी असे सुखी चौकोनी कुटुंब असताना दृष्ट लागावी अशी पती निधनाची घटना सन 2000 मध्ये घडली आणि यशस्वीनी यांचे सर्व जीवनमानच बदलून गेले. कुटुंबाच्या कर्त्या म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आली. अनुकंपा तत्वावर पतीच्या जागेवर नोकरी लागत असताना आजकालची आपली समाजव्यवस्था, गावकी, भावकी यांचा अडसरमध्ये आला आणि त्याही परिस्थितीत न डगमगता, कागदपत्रांची सर्व पूर्तता करतं, पोलिस भरतीसाठीचे सगळे निकष पूर्ण करत तब्बल सात वर्षांनी म्हणजेच 2007 मध्ये यशस्वीनी कदम या पोलीस खात्यात रुजु झाल्या. यशस्वीनी कदम या पोलिस खात्याची सेवा करत कुटूंबाचा आधार बनलेली नवदुर्गा ठरली आहे.
मुलांचे शिक्षण करत, घर संसार सांभाळत पुणे शहर पोलिस दलात आजतागायत रोज सासवडवरुन येवून जावून “सद् रक्षणाय खल निग्रहणाय” या उक्तीला पुरेपूर न्याय देत आहेत. स्वारगेट, वानवडी, विश्रामबागवाडा व नंतर शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात कार्यरत राहुन मुलगा ऋतुराज याला मर्चेंट नेव्ही मध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. कन्या राजगौरी हिला उच्च शिक्षित करून शिक्षकी पेशात दाखल केले. कुटुंबात नंतर प्रवेश केलेल्या सुनबाई प्रतिमा ही देखील सध्या डॉक्टरकी करत आहे.
एकूणच आपली नोकरी सांभाळून आपण कुटुंब उच्च शिक्षित करून नावाप्रमाणेच यशस्वी ठरल्या. आपला हा एकंदरीत प्रवास निश्चितच अभिनंदनीय आहे. आपल्या कार्य कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नारी शक्तीचा सन्मान म्हणून”तु ही दुर्गा” स्वरुपात आपला विशेष सन्मान करण्यात येत आहे.