शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथे दारु पिण्याच्या वादातून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. हि घटना १७ मे रोजी दुपारच्या सुमारास एका खोलीत घडली. चौटकन गौतम असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत रामस्नेही चौटकन गौतम (वय-३१ वर्षे, रा. उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. प्रतापपूर, ता. इटवा, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) याने शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी धुलारुराम ठाकूर (वय-२४ वर्षे, रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, ता. शिरूर, जि.पुणे, मूळ रा. राजनंदगाव, छत्तीसगड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंगवाडी येथे एका खोलीमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, दारूच्या नशेत पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागून ती व्यक्ती मयत झाल्याचा अंदाज वर्तवला गेला. मात्र, मृत व्यक्तीच्या डोक्याला असलेल्या वेगळ्या व्रणामुळे पोलिसांना संशय आला आणि त्याच वेळी खोलीच्या समोरचा सीसीटीव्ही पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्या निदर्शनास आला.
पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलिस हवालदार श्रीमंत होणमाने, जयराज देवकर, निखिल रावडे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी या खोलीमध्ये चार तासांपूर्वी एक युवक जाऊन बऱ्याच वेळाने बाहेर आल्याचे दिसले. पोलिसांनी या युवकाचा शोध घेत त्याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने दारू पिण्याच्या वादातून घरातील लोखंडी वस्तू गौतम याच्या डोक्यात मारून त्याचा खून केल्याचे कबूल केले. पोलिसांच्या तत्परतेने खुनाचे बिंग फुटले. पुढील तपास धिक्रापूर पोलीस करत आहेत.