पुणे : कर्नाटक राज्यातील कलबुर्गी (गुलबर्गा) येथील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या खून प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-दोनने पुण्यातून ताब्यात घेतले आहे. महांतप्पा सिद्रामप्पा आलुरे (रा. सरसांबा, ता. आळंद, जि. कलबुर्गी) यांचा २९ फेब्रुवारी रोजी सकाळी पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता. याप्रकरणी कलबुर्गी येथील मादन हिप्परगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयूर लक्ष्मण खेत्रे (रा. मंगळवार पेठ, पुणे) अस अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या गुन्ह्यातील संशयित आरोपी पुण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांना मिळाली होती. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, सहायक फौजदार प्रदीप शितोळे, पोलिस हवालदार सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, शंकर संपते, तुषार भिवरकर यांचे पथक नेमण्यात आले होते.
संशयित आरोपी पुणे शहरातील मंगळवार पेठेत येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे या पथकाने सापळा रचून मयूर खेत्रे याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी आरोपीला मादन हिप्परगा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.