पुणे : घनकचरा गाडीच्या धडकेने झाडाची फांदी अंगावर पडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना हांडेवाडी रस्त्यावरील सातवनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी महापालिकेच्या घनकचरा विभागातील ट्रकचालकासह उद्यान विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्याविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडित फकीरा पाटील (वय-५८, रा. वैष्णवी सिटी, आदर्शनगर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत गीता पाटील यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित पाटील यांचा जेवणाचा डबे पुरविण्याचा व्यवसाय आहे. पाटील हे आठ ऑगस्ट रोजी सकाळी पत्नी गीतासह दुचाकीवरून ग्राहकांना जेवणाचे डबे देण्यासाठी हडपसर परिसरातील हांडेवाडी रस्त्याने जात होते. त्यांच्या पुढे महापालिकेच्या घनकचरा विभागाचा ट्रक जात होता. पावसामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाची फांदी रस्त्यावर वाकलेली होती. ट्रकचालकाने त्याकडे दुर्लक्ष करत झाडाच्या फांदीला धडक दिली. ती फांदी तुटून दुचाकीस्वार पंडित पाटील आणि पत्नीच्या अंगावर पडली.
मात्र, पंडित पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून वानवडी पोलिसांनी घनकचरा ट्रकचालकासह उद्यान विभागातील संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.