पुणे: पुणे-मुंबई महामार्गावर विशेषतः घाटात अवजड वाहने अवैधरीत्या पार्किंग करत असल्याचे दिसून आल्यानंतर अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य महामार्ग पोलिसांकडे केली आहे. मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ही बाब निदर्शनास आली होती.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर मोठ्या प्रमाणात ट्रक तसेच अन्य तत्सम मालवाहू वाहने अवैधरीत्या पार्किंग करत असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः घाटभागात वाहने थांबवण्यास मज्जाव असूनही अवजड वाहने थांबत असल्याने वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.
मुंबई-पुणेदरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे तक्रार दाखल केली होती. मुंबई-पुणे महामार्गावर सातत्याने वाहनाची ये-जा सुरू असते, अशा वेळेत अवजड वाहने घाटमाथ्यावर थांबत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एमएसआरडीसीच्या या तक्रारीची गंभीर दखल घेत राज्य महामार्ग पोलिसांनी घाटात किंवा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर थांबणाऱ्या किंवा अवैधरीत्या पार्किंग करणाऱ्या वाहनचालक व संबंधित संस्थेवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.