पुणे : व्हिलचेअर क्रिकेट टी २० सामन्यात मुंबई संघाने महाराष्ट्रावर ६ गडी व ८ षटके शिल्लक ठेवून दणदणीत विजय मिळविला आहे. पुणे येथील रोटरी क्लब ऑफ सेंट्रल व द पुना क्लब लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिलचेअर क्रिकेट टी २० सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.
पूना क्लब क्रिकेट मैदानावर रविवारी (ता. १०) हा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र संघातील उत्क्रुष्ट फलंदाज रविंद्र बारवकर याने आक्रमक खेळी करीत अवघ्या ५४ चेंडूंमध्ये ७४ धावा काढल्या. बारवकरच्या खेळीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने ७ गाड्यांच्या मोबदल्यात २० षटकांत १२७ धावांवर मजल मारली. तर मुंबई संघाचा गोलंदाज विश्वनाथ गुरव व दिनेश मेटुपेल्ली यांनी प्रत्येकी ३ फलंदाज बाद केले.
महाराष्ट्र संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघाचा फलंदाज संतोष रांजगने याने १९ चेंडूंमध्ये ४५ धावांची खेळी केली. तर दिनेश मेटुपेल्ली यांनी २६ चेंडूंमध्ये ३२ नाबाद धावा राखत महाराष्ट्र संघावर दणदणीत विजय मिळविला. मुंबई संघाने हे आव्हान १२ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले. या सामन्याच्या महाराष्ट्र संघाचे गोलंदाज रविंद्र बारवकर याने २ तर नितीन नरवडे याने १ मुंबईचा फलंदाज बाद केला.
दरम्यान, उपविजेता महाराष्ट्र संघातील रविंद्र बारवकर हे सामन्यातील उत्क्रुष्ट फलंदाज ठरले व विजेता मुंबई संघातील विश्वनाथ गुरव हे उत्कृष्ट गोलंदाजीचे मानकरी ठरले. तसेच मुंबई संघातील दिनेश मेटुपेल्ली यांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तर महाराष्ट्र संघाचे कर्णधार ओंकार रौंदाळे यांनी रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल व द पुना क्लब लिमिटेड यांचे आभार मानले.