लोणी काळभोर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा निर्यात बंदी उठवून, दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान द्यावे. तसेच बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये अखंडित वीज पुरवठा करावा, हे तीन निर्णय तातडीने घेतल्यास मी पक्षाचा विचार न करता राजकीय जोडे बाजूला ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी स्वतः उभा राहीन, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
हवेली तालुक्याच्या पूर्व भागात उरुळी कांचन, थेऊर फाटा, लोणी काळभोर येथे खासदार सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाचे स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा भारती शेवाळे, हवेली तालुका अध्यक्ष संदीप गोते, प्रवक्ते विकास लवांडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असून, बी बियाणे, खतांच्या किमतीत झालेली वाढ, वीज दरवाढ, कांदा निर्यात बंदी, शेतमालाला हमीभाव मिळत नाही. कांद्याची निर्यात बंदी होऊन आज २३ वा दिवस उजाडला तरी सत्ताधारी पक्षांना याची जाणीव नाही. सत्ताधारी पक्ष शेतकरी आक्रोश मोर्चाविषयी बोलतात. पण त्यांच्या मागण्यांविषयी बोलत नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याविषयी बोलत नाहीत.
पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार
आज एक आनंदाची बातमी आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करत आहेत. विरोधकांना फक्त विरोध दिसतो, विरोधाचे मुद्दे दिसतात. पण सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सत्ताधारी पक्षाला दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचा शेतकरी विरोधी चेहरा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षांनी उघड केला आहे. निवडणुकीसंदर्भात पक्ष देईन ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे.
मराठा आरक्षणाला कधीच केला नाही विरोध
मराठा आरक्षणासाठी जातनिहाय जनगणना होणे अत्यंत गरजेचे असून, जरांगे पाटील यांनी २० तारखेची मुदत दिली आहे. सरकार याबाबत काय भूमिका घेत आहे, त्यावर आमचे लक्ष आहे. मराठा आरक्षणाला मी कधीच विरोध केला नाही, असे कोल्हे यांनी सांगितले.