दौंड : दौंड शहरात बाहेरगावाहून आलेल्या उंटवाल्यांनी चिमुकलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे. ही घटना 16 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दौंड येथील गोपाळवाडी रोड परिसरात घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आजोबांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तीन उंट वाल्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे. जिगर नाना चव्हाण, सनी नाना चव्हाण, प्रथमेश महेंद्र साळवे (सर्व रा. चिंचोडी, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड शहरामध्ये बाहेरगावावरून उंटस्वार आले होते. हे उंटवाले बच्चे कंपनीला उंटावरून चक्कर मारून मिळालेल्या पैशातून आपली उपजीविका भागवतात. परिसरात आलेले उंट पाहून लहान मुले ही उंटावर बसून चक्कर मारण्यासाठी आपल्या पालकांकडे हट्ट करतात. म्हणून पालक हे उंटवाल्यांच्या विश्वासावर आपली मुले त्यांच्या स्वाधीन करतात. दरम्यान, फिर्यादी यांच्या नातीने उंटावर बसण्यासाठी हट्ट धरला. त्यामुळे फिर्यादी आजोबांनी त्यांच्या नातीला उंटावर बसविले. उंटस्वार नातीला फेरफटका मारायला घेऊन गेला. त्यावेळी नराधम उंटवाल्याने चिमुकल्या मुलीचा विनयभंग केला.
त्यानंतर चक्कर मारून झाल्यावर त्याने चिमुकलीला तिच्या आजोबांच्या स्वाधीन केले. तसेच दुसऱ्या मुलीला चक्कर मारण्यासाठी पुन्हा त्याच परिसरात घेऊन गेला. मात्र, आजोबांनी चक्कर मारून आलेल्या नातीला विचारले असता, तुला एवढा उशीर का झाला, तेव्हा तिने सांगितले की, उंट वाल्याने मला आडबाजूला घेऊन जात त्याने माझ्या कमरेखाली हात लावला होता.
हे ऐकल्यावर फिर्यादी आजोबा यांनी आपल्या नातलगांच्या मदतीने उंट वाल्याला पकडले व पोलिसांच्या हवाली केले. त्याच्या दोन साथीदारांनी ही परिसरातील लहान मुलांच्या बाबतीत असेच गैरवर्तन केले असल्याचे समजल्याने त्यांनाही पकडण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.