हडपसर (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या टोळीचा म्होरक्या अमन संजय दिवेकर (टोळी प्रमुख) व त्याच्या २ साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली.
अमन संजय दिवेकर (वय-२४, रा. जैननगर, बिबबेवाडी, पुणे, मूळ गाव- दौंड, जि. पुणे, टोळी प्रमुख), विशाल संजय लोखंडे (वय-२४, रा. इंदीरानगर, अप्पर डेपो, बिबवेवाडी, मूळ गाव- उस्मानाबाद, टोळी सदस्य) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तर एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ख्वाजा गरीब नवाज मश्जिदीजवळ, म्हाडा सोसायटी, हडपसर, पुणे येथून त्यांच्या मोटर सायकलवरुन जात असताना, तीन अनोळखी व्यक्तींनी संगनमत करुन, एकाने फिर्यादीच्या मोटरसायकलचे हॅण्डल पकडून गाडी बंद करण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्याने फिर्यादीच्या गळ्याला धारधार लोंखडी हत्यार लावले व तिसऱ्या व्यक्तीने फिर्यादीच्या पॅन्टच्या पाठीमागील खिशातून ४ हजार रुपये जबरदस्तीने कढून घेतले होते. कोणाला सांगितले तर खलास करुन टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचा तपास हडपसर पोलीस गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस करीत असताना, एका खबऱ्याकडून युनिट ५ चे पोलीस अंमलदार यांना त्यांच्या बातमीरादारामार्फत मिळालेल्या बातमीवरुन, सापळा लावून वरील आरोपींना ताब्यात घेतले.
टोळीप्रमुख अमन संजय दिवेकर याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असून, त्यांनी बेकायदेशीर मार्गाने बिबवेवाडी, काळे-पडळ, म्हाडा कॉलनी हडपसर, सय्यदनगर या भागांमध्ये त्यांच्या टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी बेकायदा घातक शस्त्रे बाळगून जबर दुखापत करणे, विनयभंग करणे, गाडयांची तोड-फोड करुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे, अशा प्रकारे स्वतःस व टोळीच्या सदस्यास अवैध मार्गाने आर्थिक लाभ व इतर फायदा व्हावा, या उद्देशाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार संघटितपणे करीत आहेत. टोळीवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्याच्या गुन्हेगारी वर्तनात फरक पडला नाही.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, यांनी पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ५ पुणे शहर, आर. राजा यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केलेला होता. या अर्जाची छाननी करून अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
ही कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), संदीप शिवले, सहायक पोलीस निरीक्षक, सारिका जगताप, दोरकर, निगराणी पथकातील पोलीस अंमलदार, प्रविण शिंदे, महेश उबाळे, वसीम सय्यद, गिरीश एकोर्गे, बाबा शिंदे, रामेश्वर नवले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.