पुणे : मासिकपाळीमध्ये महिलांना होणारा त्रास हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सैनिकांकडून १२ जून २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनामध्ये असे म्हटले होते की, आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर देशाप्रमाणे मासिक पाळीमध्ये दोन दिवसांची पगारी सुट्टी मिळते. त्याचप्रमाणे महिलांना होणारा त्रास हा जाणून घेऊन आपण महाराष्ट्रातील नोकरदार महिलांना पगारी सुट्टी द्यावी, अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली होती. पण सरकार तळ्यात मळ्यात असल्यामुळे या मागणीचा निर्णय लागला नाही.
आता याच विषयाला बुधवारी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेमध्ये महिलांच्या मासिक पाळी संदर्भात जे विधान केलं आहे ते म्हणजे मासिक पाळी आल्याने महिला अपंग होत नाही. त्यामुळे पगारी सुट्टीची योजनेची गरज नाही, असे घाणेरड्या पद्धतीने विधान करणाऱ्या वक्तव्याचा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेकडून तीव्र निषेध व्यक्त केला. त्यामध्ये घोषणाही देण्यात आल्या. स्मृती इराणी यांच्यासारख्या समजदार केंद्रीयमंत्र्यांनी व एक महिला असून, हे घाणेरडे वक्तव्य करणं हे त्यांना शोभा देत नाही. पण आम्ही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विनंती करतो की, बालकल्याण विकास महिला केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांचा त्वरित राजीनामा घ्यावा.
एक लाजिरवाणी गोष्ट म्हणजे स्मृती इराणी सारख्या केंद्रीयमंत्र्यांनी स्वतः महिला असून महिलांबद्दल असं वक्तव्य करणे हे त्यांना कुठेही शोभत नाही. ज्या वेदना मासिक पाळीमध्ये महिलांना होतात त्या वेदनेची जाण म्हणून एका महिलेला असते. आज मासिक पाळी आल्यानंतर महिला अपंग होत नाही, असे विधान करणाऱ्या स्मृती इराणी या पहिली महिला असेल, की जिने स्वतः महिला असून देखील देशातल्या महिलांची अब्रू अक्षरशः चव्हाट्यावर मांडण्याचे विधान त्यांनी केले.
सत्तेचा माज आलेल्या स्मृती इराणी यांनी लवकरात लवकर महिलांची माफी मागावी. अन्यथा त्या पदाचा राजीनामा द्यावा, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी सुनावले. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना याहीपेक्षा तीव्र आंदोलन करतील, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पिंपरी चिंचवड महिला शहर अध्यक्षा सीमा बेलापूरकर यांनी सांगितले.