संदीप टूले
केडगाव : सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागलेली लढत म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातील असून, यामध्ये दोन्हीही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे दोन्हीकडून डावे-प्रतिडावे टाकले जात असून, दोन्हीही गटाकडून बेरजेच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. त्यात बारामती लोकसभेची जबाबदारी ही भाजपचे पुणे ग्रामीणचे एकमेव आमदार राहुल कुल यांच्यावर असल्यामुळे दौंड तालुक्याला या निवडणुकीत विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
मागील आठवड्यापूर्वी सहसा सक्रीय न दिसणारे भाजपचे कार्यकर्ते कमालीचे सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत असून, गावागावांतील प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदाऱ्या वाटण्यात आल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मागील दोन दिवसांपूर्वी यवत येथे शरद पवार यांची झालेली जोरदार सभा व एका वृत्तवाहिनीच्या सर्व्हेमध्ये बारामतीची जागा ही धोक्यात असल्याचे संकेत देण्यात आले होते.
त्यात दौंड तालुक्यात ओबीसी पर्व हा नवीन फॅक्टर ही भाजपची डोकेदुखी वाढवण्याचे काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे कारण दौंड तालुक्यात ओबीसी मतांचा मोठा निर्णायक मतदार आहे. हा आता जर हा मतदार ओबीसी पर्वाकडे वळला तर आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसेल. त्यामुळे राहुल कुल यांनी स्वतःची यंत्रणा सक्रीय केली असल्याचे पाहायला मिळत आहे.
दौंडचे राजकारणच वेगळे
दौंडचे राजकारणच तशा तऱ्हेने वाईट आहे. यापूर्वी जे-जे लोक पवारांच्या बाजूने निवडणुकीला उभे राहिले त्यांना लोकांनी पराभूत केले हा देखील इतिहास आहे. दुसरीकडे दोन्ही गट एकत्र आले तर लोक तिसरीकडेच जातात. म्हणजे तिसरा पर्याय निवडतात हाही इतिहास आहे.
2014 झाले जानकरांना मतदान
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात होते. त्यावेळी दौंडमध्ये रमेश थोरात आणि राहुल कुल एकत्र होते. मात्र, प्रत्यक्षात मतदान जानकरांना झाले. जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा अनपेक्षित ३५ हजार मतांची आघाडी याच दौंड तालुक्यातून घेतली होती.आताही आजी-माजी आमदार दोघे महायुतीसाठी एकत्र आहेत. त्यामुळे मागील काळासारखा धोका उद्भवू नये.
तसेच दौंडच्या जनतेमध्ये महायुतीच्या कारभारावरून नाराजी आहे. असे चित्र बिंबवण्याचे कामही महाविकास आघाडी व ओबीसी पर्वच्या कार्यकर्त्यांचे सुरू आहे. याच नाराजीचे मतात रूपांतरित करण्यासाठी शरद पवारांची येथे यंत्रणा कामाला लागली असल्याची चर्चा आहे. म्हणून आमदार राहुल कुल यांनी स्वत:च सारी यंत्रणा हाती घेतल्याचे बोलले जात आहे.