दौंड, (पुणे) : जनाई शिरसाई उपसा सिंचन योजेनेअंतर्गत व्हिक्टोरिया तलावाच्या पोटचारीतून दौंड तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या रोटी (ता. दौंड) ४० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पाणी पोहोचले आहे. रोटी गाव तलावात हे पाणी पोहोचल्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आमदार राहुल कुल यांच्या हस्ते जल पूजनाचा कार्यक्रम पार पडला.
रोटी हे जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील दौंड तालुक्यातील शेवटचे गाव आहे. या ठिकाणी पाणी पोहोचविण्यास अनेक अडचणीं येत होत्या परंतु रोटी गावातील तरुणांनी श्रमदान व लोकसहभागातुन जलसंधारणाची चळवळ उभी करून गावाचा कायम दुष्काळी शिक्का पुसण्याचा निर्धार केला होता. यासाठी लोकसहभाग व श्रमदानातून १ किलोमीटर लांबीच्या या पोटचारीच्या दुरुस्तीसाठी ३-४ महिन्यांच्या कालावधी नंतर हे काम पूर्ण झाले.
आमदार राहुल कुल यांनी पाटबंधारे विभागाशी पाठपुरावा, समन्वय करून आवश्यक यंत्रणा व तांत्रिक सहकार्य आपण उपलब्ध करून दिले व सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून गावाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात राहुल कुल यांना यश आले आहे. प्रसंगी याकामी कष्ट घेणाऱ्या सर्व तरुण सहकाऱ्यांचे, विविध मार्गाने मदत केलेल्या सर्व ग्रामस्थांचे व पाटबंधारे विभागाचे अभिनंदन केले. याआधी हिंगणी गाडा शाखा अंतर्गत सुमारे ९ किमी लांबीच्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम करून जनाई शिरसाई उपसा सिंचन योजेनचे पाणी मौजे रोटी येथे आणण्यात यश आले होते.
दरम्यान, दौंड तालुक्यातील कायम स्वरूपी दुष्काळी गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या योग्य अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्याचे व सदर योजनांमध्ये नवीन तलाव समाविष्ट करणे, पाणी वाटप व पुनर्सर्वेसक्षणासाठी आग्रही राहण्याचे आश्वासन यावेळी आमदार कुल यांनी उपस्थितांना दिले.