राहुलकुमार अवचट
यवत (पुणे) : ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यात यावे व धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करावा, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी केली.
ॲड. कुल म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात ओबीसी समाज हा सुमारे ५४ टक्के आहे. त्यात त्यांना २७ टक्के आरक्षण आहे. ओबीसी प्रवर्गात ३०० हून अधिक जातींचा समावेश असून, व्हिजेएनटी, माळी, तेली, धनगर, वंजारी, कुणबी या सगळ्या प्रमुख जाती आहेत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण समाजबांधवांना आरक्षण देण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून जोर धरू लागली आहे.
२०१८ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी कायदा केला. त्यात कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत विविध सवलतींसह सुमारे १६ टक्के आरक्षण मंजूर केलं. त्यामुळे आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठी योग्य आणि तर्कशुद्ध कारणं असली पाहिजे, असे असताना महाराष्ट्रात मराठा आरक्षण देताना ती दिसलेली नाहीत. किंबहुना २०१९ नंतर आलेल्या सरकारला ही भूमिका स्पष्टपणे मांडता आली नाही, त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली.
आरक्षणाची असलेली ५० टक्के मर्यादा वाढविण्याची गरज
ओबीसी समाजासह इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी, राज्यातील आरक्षणाची असलेली ५० टक्के मर्यादा वाढविण्याची आवश्यकता आहे. तसेच राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्याकरिता समाजाने वारंवार मागणी करुनही याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे. हा समाज भटक्या व विमुक्त जातीमध्ये येत असून, धनगड व धनगर या नाम फरकाच्या वादामुळे, या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश होत नसल्याच्या अनेक तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत.
धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करावा
धनगड व धनगर या नावाच्याबाबत तपासणीसाठी उपसमिती स्थापन करून अद्याप त्यांचा कोणताही अहवाल शासनाकडे प्राप्त झालेला नाही. यासाठी देखील सरकारने तातडीने पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यात यावे व धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करावा, अशी मागणी आमदार ॲड. राहुल कुल या माध्यमातून सरकारकडे केली आहे.