पुणे : आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतील कर्मचारी भविष्य निधीच्या साडे ९ कोटी रुपयांचा अपहार करून रक्कमेचा फायदा घेणाऱ्या ८९ आस्थापनाचे प्रोपरायटर (संस्थेच्या मालकांवर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२० ते डिसेंबर २०२३ या कालावधीत पुण्यातील गोळीबार मैदान येथील भविष्य निर्वाह निधी संघटन कार्यालयात घडला.
मनोजकुमार असराणी (वय-४५, रा. रावेत, पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ८९ आस्थापनाच मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भविष्य निर्वाह निधी संघटन, गोळीबार मैदान येथे इन्फोर्समेंन्ट ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत. नमुद ठिकाणी एकुण ८९ आस्थापना भारत सरकार यांच्या आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेच्या पी. एफ. रक्कमेचा फायदा घ्यायचा होता. त्यासाठी आस्थापनाच्या प्रोपरायटर यांनी नमुद ठिकाणी पी. एफ. नंबर मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करुन पी. एफ. नंबर मिळविले होते.
हे नंबर मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे ही पी एफ संघटन यांच्याकडे बोगस शॉप अॅक्ट, त्यामध्ये वेगळे नाव व पत्ता वेगळा, सर्वांचे मोबाईल क्रमांक एकच, जो पत्ता दिला आहे. त्या पत्त्यावर आस्थापना अस्तीत्वात नाही, असे भविष्य निर्वाह निधी संघटन, कार्यालयाच्या तपासणीमध्ये आढळून आले आहे.
दरम्यान, ८९ आस्थापना पैकी ४२ आस्थापनांनी भारत सरकार यांच्याकडून रुपये ९ कोटी ५६ लाख ७६ हजार १२३ रुपये बोगस कामगारांच्या नावे घेतले आहेत. व त्यापैकी २ कोटी ४० लाख ८५ हजार ९१० रुपये काढून घेवून स्वतः साठी वापरले आहेत. तसेच ४७ आस्थापनांनी ८ कोटी ८९ लाख ३५ हजार २४६ रुपये बोगस कामगारांच्या नावे घेतले आहेत. व त्यापैकी २ कोटी २१ लाख ०८ हजार ५७७ रुपये काढून घेवून स्वतः साठी वापरून घेतले.
८९ आस्थापनांनी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेच्या पी. एफ. रक्कमेचा गैरलाभ घेवून शासनाची फसवणुक केली आहेत. याप्रकरणी मनोजकुमार असराणी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आस्थापनाच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे करीत आहेत.