लोणावळा, (पुणे) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यवळणाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास वऱ्हाडाच्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या बसमधून तब्बल ४२ प्रवाशी प्रवास करत होत. बसला आग लागल्यानंतर सर्व प्रवासी तातडीने खाली उतरल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत बस पूर्णपणे जाळून खाक झाली आहे. ही घटना मध्यरात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून खासगी बस ४२ प्रवाशांना घेऊन पुण्याच्या दिशेने निघाली होती. खंडाळा घाटातील खोपोली बाह्यवळण परिसरात बसने अचानक पेट घेतला. हा प्रकार बसचालकाच्या लक्षात आला. त्यावेळी काही प्रवासी गाढ झोपेत होते. प्रवासी आणि बसचालक तातडीने बसमधून बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.
या घटनेची माहिती मिळताच खोपोली अग्निशमन दलाचा बंब, देवदूत पथक, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, खोपोली पोलीस ठाण्यातील पथक, डेल्टा पथकाने घटनास्थळी धाव घेत जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. दरम्यान, बसमधील ४२ प्रवासी, तसेच चालक सुखरुप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.