पुणे : पुण्यात आगीच्या घटना सातत्याने वाढत चाललेल्या आहेत. अशातच आता शहरातील बावधन परिसारत आगीची घटना घडली आहे. यामुळे परिसारत मोठी खळबळ उडाली आहे. इमारतीला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे दुकान आणि गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बावधन परिसरात शिंदे नगरजवळील एका स्टुडिओला भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून पाच वाहने घटनास्थळी रवाना केली आहेत. तर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून काळजी घेतली जात आहे.
दरम्यान, घटनेत अग्निशमन दलाच्या जवानांनी सात जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. तर आग विझवण्यासाठी वारजे, पाषाण, कोथरूड, एरंडवणे, औंध, वारजे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीचं कारण अद्याप समजू शकलेले नाही.
हडपसर भागात भागाराच्या गोडाऊनला आग
तसेच हडपसर भागातील वैदुवाडी येथे एका भंगार मालाच्या गोडाऊनला शनिवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत गोडाऊन जळून खाक झाले आहे. पाण्याचा मारा करून काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीचे कारण समजू शकले नाही.