पुणे : पुणे शहरातील वाघोली परिसरात सासरकडील त्रासाला कंटाळून एका विवाहितेने ओढणीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याची घटना घडली. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर लोणीकंद पोलिसांनी पतीसह सासू तसेच नणंदेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रीती संजय शिंदे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी पती संजय सखाहरी शिंदे, सासू इंदूमती शिंदे (दोघे रा. ऐश्वर्य लक्ष्मी सोसायटी, वाघोली, नगर रस्ता), नणंद प्रतिभा गणेश माळोदे (रा. आडगाव, नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीतीचे वडील मोहन विष्णू मते (वय 47, रा. पार्थ रो हाऊस, आडगाव, जि. नाशिक) यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ मध्ये प्रीतीचा संजय शिंदे याच्याशी विवाह झाला होता. संजय खासगी कंपनीत कामाला आहे. काही दिवसांच्या सुखी संसारानंतर संजय आणि प्रीती यांच्यात वाद सुरू झाले. तसेच सासरकडील मंडळींनी सुद्धा महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रीतीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. सासरकडील मंडळींकडून होत असलेल्या त्रासाची माहिती प्रीतीने आपल्या वडिलांना दिली होती. त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरी देखील पतीकडून प्रीतीचा मानसिक छळ सुरुच होता.
दरम्यान, त्रास असह्य झाल्याने प्रीतीने वाघोली येथील राहत्या घरात ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी संजय शिंदे, सासू इंदुमती शिंदे, नणंद प्रतिभा माळोदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करत आहेत.