Maratha Reservation : यवत : कसूर्डी येथे दि.१ नोव्हेंबर पासून संपूर्ण कासुर्डी गाव आणि सकल मराठा समाज यांच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं होतं. त्याला समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे दि. २ नोव्हेंबर पासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती.
काल रात्री ७ ते ९ या वेळेत मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ दौंड तालुक्यातील खोर गावचे ह. भ. प. प्रवीण महाराज चौधरी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. किर्तन चालू असतानाच जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले असल्याची माहिती मिळाली. यावेळी संयोजन समितीने निर्णय घेऊन उपोषणकर्त्यांचे उपोषण महाराजांच्या हातांनी सरबत घेऊन सोडले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्म, मराठा आरक्षण जरांगे पाटील या विविध विषयांवरती महाराजांनी अतिशय सुंदर असे कीर्तन केले. यावेळी गावातील इतर समाज बांधवांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. राज्य सरकारने जरांगे पाटील यांना २ जानेवारी पर्यंत वेळ मागितला असून जरांगे पाटील यांनी साखळी उपोषण चालू ठेवून आमरण उपोषण सोडले अशी माहिती संयोजकांनी यावेळी दिली असून याबाबत विचार करता ज्या ज्या वेळी जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी समाजापुढे आव्हान करतील त्यावेळी कासुर्डीकर ग्रामस्थ म्हणून आणि सकल मराठा समाज म्हणून शंभर टक्के प्रतिसाद देण्याचे नागरिकांनी जाहिर केले.
गेल्या आठ दिवसापासून कासुर्डीमध्ये शांततामय पद्धतीने आंदोलन चालू होते. आरक्षणाबाबतच्या घोषणा, कॅन्डल मार्च यांसह विविध मार्गाने कासुर्डीकरांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला अखेर कीर्तनाचे या आंदोलनाची सांगता करण्यात आली.