उरुळी कांचन (पुणे) : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या लढ्याला यश आल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचन येथे मोठा जल्लोष करण्यात आला. शनिवारी (ता. २७) डीजेच्या तालावर मोठा जल्लोष करण्यात आला. यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता.
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, याबाबत अध्यादेशही काढण्यात आला आहे. ही घोषणा राज्य शासनाने केल्यानंतर मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला. लोणी काळभोर येथील मराठा बांधवांनी दत्त मंदिराजवळ सकाळपासूनच फटाक्यांची आतिषबाजी करण्यास सुरवात केली. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला होता. मराठा बांधवांनी भक्ती शक्ती चौकात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व मराठा आरक्षण मिळाल्याचा आनंद साजरा केला.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील हनुमान मंदिर परिसरात मराठा समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठा, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, श्री संभाजी महाराज की जयच्या घोषणा देऊन जल्लोष साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जारांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला.
दरम्यान, संपूर्ण उरुळी कांचन गावातून डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी अनेक गाण्यावर ताल धरला. महिलाही यामध्ये मागे नव्हत्या. फुगड्या खेळून महिलांनी आनंद व्यक्त केला. मराठा एकजुटीची ताकद सरकारला कळाल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.
in