-पोपट पाचंगे
कारेगाव : सध्या होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांशी सविस्तर चर्चा करुनच 30 किंवा 31 ऑक्टोबर रोजी उमेदवार निश्चित करणार असल्याचे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणुकीसाठी जरांगे यांनी राज्यातील विविध जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जाणून आंतरवली सराटी येथे घेतल्या. त्यात पुणे जिल्ह्यासह शिरुर तालुक्यातील ढोकसांगवी येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सतिश पाचंगे यांनी जरांगे यांच्याकडे आंबेगाव – शिरुर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
त्या पाश्वभुमीवर पाचंगे यांनी जरांगे यांची भेट घेत आंबेगाव – शिरुर विधानसभा निवडणुकीसाठी मुलाखत दिली. यावेळी मतदारसंघाची माहिती जरांगे यांनी पाचंगे यांच्याकडून जाणून घेतली. यावेळी पाचंगे यांच्या समवेत तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष काळुराम मलगुंडे, किरण पाचंगे, सुरेश पाचंगे, अक्षय जाधव, अनिकेत देशमाने, प्रताप पाचंगे, दादा मलगुंडे, संदीप कोळेकर, अक्षय पाचंगे, गणेश मलगुंडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
आंबेगाव – शिरुर विधानसभा मतदारसंघातून उद्योजक रमेश येवले, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे आणि बाबाजी चासकर यांनीही मुलाखती दिल्याचे सांगण्यात आले.
उमेदवार कोणत्या मतदारसंघात उभे करायचे, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात उमेदवार उभे न करता कुणाला पाठींबा द्यायचा आणि कुठे उमेदवार उभे न करता पाडायचे यासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहे, असे जरांगे यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मतदारसंघात एकच उमेदवार उभा करावा, असे आपण सर्वांना सांगितले आहे. ज्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरुन ठेवायचे त्यांनी ते भरून ठेवावेत. अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीची समीकरणे जुळण्यासाठी आपण समाज बांधवांशी चर्चा करुन मतदारसंघनिहाय उमेदवारांची नावे 30 किंवा 31 ऑक्टोबर रोजी घोषित करणार असल्याचे, मनोज जरांगे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
केवळ एकाच जातीच्या आधारे निवडणूक जिंकणे शक्य नसल्याने आपण पुढील दोन तीन दिवस अन्य जातीबरोबरची समीकरणे जुळवून आणण्यासाठी काम करणार आहे. पुढील काळात किती विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करायचे आणि किती मतदारसंघात पाडायचे याचा हिशेब मांडला जाईल, असे जरांगे यांनी यावेळी बोलताना सांगितले.